लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची सरकारे फोडून आपल्या पाठिंब्याची सरकारे वेगवेगळ्या राज्यांत आणणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. हरियाणामधील भाजप सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. जननायक जनता पार्टीसोबतची चार वर्षे जुनी युती तुटल्याने सरकार कोसळले आहे. आता भाजपा अपक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे असले तरी जेजेपीचे चौटाला दिल्लीतच ठाण मांडून बसले आहेत.
सध्याचे संख्याबळ पाहता भाजपाला सत्ता स्थापन केली तरी काठावरच घुटमळावे लागणार आहे. खट्टर यांनी चंदीगडमध्ये भाजपाचे आमदार आणि अपक्ष समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. तर परिस्थिती सावरण्यासाठी भाजपाने दिल्लीतून अर्जुन मुंडा आणि तरुण चुघ यांना निरीक्षक म्हणून पाठविले आहे.
दुसरीकडे जेजेपीचे नेते, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून दोन्ही पक्षांत गोष्टी एवढ्या ताणल्या गेल्या की राज्यातील सरकार कोसळले आहे.
सरकार का कोसळले...जेजेपी नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिल्लीत भाजप प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली. वृत्तानुसार, याच बैठकीत भाजपने जेजेपीसोबत लोकसभेची एकही जागा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र जेपीपीला लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याने युती तुटली. आता चौटाला अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी या दोन नेत्यांची भेट होणार आहे. या बैठकीवर पुढील राजकीय परिस्थिती अवलंबून असणार आहे.