नवी दिल्ली - निवडणुका जवळ आल्या सर्व राजकीय नेतेमंडळींसाठी राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी असतो. आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे तर काही महिन्यांवर लोकसभा निवडणूकदेखील येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर, राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्येक राजकीय नेता राम मंदिराचा मुद्दा लावून धरताना दिसत आहे. भाजपाचे नेते आणि हरियाणातील मंत्री अनिल विज यांनीही अयोध्येतील राम मंदिर विवादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिर विवादासंदर्भात सुप्रीम कोर्ट घेत असलेल्या भूमिकेवर विज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अनिल विज म्हणाले की, सुप्रीम कोर्ट महान आहे, जे हवे ते करावे. सर्व सुप्रीम कोर्टाची इच्छा. हवे असल्यास याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही सुप्रीम कोर्ट उघडावे. पण जेव्हा राम मंदिराचा विषय येतो, ज्याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. त्यावर 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. ही सर्व तर सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे.
(राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव)
दरम्यान, राम मंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी तीन महिने म्हणजेच जानेवारी २0१९पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.