नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानवरून भाजपाने त्यांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणाचे मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज (Anil Vij) राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांना देशाच्या सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये? असा सवाल देखील अनिल विज यांनी केला आहे.
अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधत टीका केली आहे. "राहुल गांधी सातत्याने देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात का उभं करू नये?, देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी तामिळनाडूमध्ये देशातील सरकारने शेतकरी आणि मजुरांचा विश्वास जिंकल्यास सीमांवर सैनिक तैनात करण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. "जर भारतातील मजूर, शेतकरी, विणकर मजबूत आणि संरक्षित झाल्यास चीन भारताच्या भूभागात पाय ठेवण्याचं धाडस करणार नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच आणखी एक ट्विट करत "चीन भारतीय क्षेत्रात कब्जा करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिस्टर 56 इंच यांनी एकदाही चीन हा शब्द म्हटलेला नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं"
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. भाजपाचे नेते अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं" असं विज यांनी म्हटलं आहे. अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.