Haryana political crisis : हरियाणात तीन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आता विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी राज्य सरकार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवू शकते, अशी माहिती समोर आली आहे. हरियाणा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होणार आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केला आहे.
जेजेपीने हा मुद्दा उपस्थित करायला नको होता, पण आता त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने ते अडचणीत आले आहेत. जेजेपीचे सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे मनोहर लाल खट्टर म्हणाले. तसेच, काँग्रेस देखील एकजूट नाही आणि ३० पैकी ४-५ आमदार फटण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी काँग्रेसच्या ३० आमदारांच्या सह्या मागवल्या आहेत, असेही मनोहर लाल खट्टर म्हणाले.
अलीकडेच हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पत्र लिहून विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली होती. त्यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली आहे. राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे या पत्रात लिहिले होते. तसेच, हरियाणामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही म्हटले आहे.
सध्या भाजपाजवळ ४० आमदार?गेल्या काही दिवसांपूर्वी हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान यांनी दावा केला होता की, हरियाणातील तीन अपक्ष आमदार सोमवीर संगवान, रणधीर सिंग गोलन आणि धरमपाल गोंदर यांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सध्या ९० जागांच्या हरियाणा विधानसभेत ८८ आमदार आहेत, त्यापैकी भाजपाचे ४० आमदार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजपा सरकारला आधी जेजेपी आमदार आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, मात्र जेजेपीनेही पाठिंबा काढून घेतला होता आणि आता तीन अपक्षांनीही पाठिंबा काढून घेतला आहे.