हरयाणातील सोनिपतमधील फरमाणा गावांमध्ये मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. येथील हरकिशन नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. घरात अधुनमधून लागत असलेली आग हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच आता पीडित कुटुंबासह ग्रामस्थही भीतीच्या छायेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याच्या घरातील दागिने ठेवलेल्या लॉकरला आठ दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यानंतर मागच्या आठवडाभरात घरात तब्बल २२ वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही आग कशी लागतेय, हे जाणून घेण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थ सातत्याने पहारा देत आहेत. नेमका काय प्रकार घडतोय, हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हरिकिशन यांच्या घराजवळ गर्दी करत आहेत. आठ दिवसांपूर्वी जेव्हा या घरातील कपाटाला आग लागली होती, तेव्हा लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे दागिने वितळून गेले होते. तेव्हापासून घराच्या आत विविध ठिकाणी आग लागल्याच्या २२ घटना घडल्या आहेत. या आगीत घरातील कपडे, फर्निचर आणि इतर साहित्य जळालं आहे. मात्र ही आग कशी लागत आहे त्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब भयभीत झालं आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे आठ म्हैशी आहेत. त्यांचं दूध विकून आम्ही उदरनिर्वाह करतो. मात्र वारंवार आग लागत असल्याने घाबरलेले ग्रामस्थ आमच्या घरात दूध घ्यायलाही येत नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांकडून या शेतकऱ्याच्या घराजवळ पहारा देत आहेत.
पीडित शेतकरी कुटुंबानं सांगितलं की, रात्री जेव्हा मुलं झोपतात, तेव्हा कुटुंबातील मोठे सदस्य हे जागरण करतात. कधी कुठे आग लागून नुकसान होईल हे सांगता येत नसल्याने, हे कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहे. आता या प्रकाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून, काही जण ही घटना अंधश्रद्धा असल्याचे म्हणत आहेत. तर काही जण यामागे काही नैसर्गिक किंवा शास्त्रीय कारणं असल्याचाही दावा केला जात आहे. आता या आगीची फॉरेन्सिक पथकाला बोलावून तपासणी करावी, अशी मागी पीडित कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.