हरियाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नूंहमधील हिंसाचारानंतर मंगळवारी दुपारपर्यंत पोलिसांनी १६ एफआयआर दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसेच्या या आगडोंबामध्ये १३३ वाहने पेटवून देण्यात आली आहेत. त्याबरोबरच ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नूंह पोलिसांनी सांगितलं की, जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या एकूण १३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७ आरएफ, २ बीएसएफ, २ सीआरपीएफ, २ आयटीबीपीच्या तुकड्या तैनात आहेत. दरम्यान, हिंसाचारा प्रकरणी आतापर्यंत एकूण २७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
नूंह येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले एसपी नरेंद्र बिजारणिया यांनी सांगितले की, काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. व्हिडीओंच्या मदतीने दंगेखोरांची ओळख पटवली जात आहे. त्यांना लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये १६ एफआयआर दाखल केल्या आहेत. या दंगलीमध्ये एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गुरुग्राममधील दोन होमगार्ड नीरज आणि गुरसेवक यांचा समावेश आहे.
यावेळी दंगेखोरांनी सुमारे १३३ वाहने जाळल्याचीही माहिती समोर येत आहे. त्या पोलिसांची ८ वाहने आणि यात्रेमध्ये सहभागी झालेल्या १३३ वाहनांचा समावेश आहे. तर एकूण ६० जण जखमी झाले आहेत. यामध्ये पोलिसांचे १० जवान आणि इतरांचा समावेश आहे. या दंगलीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल विज हे सुद्धा उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासह तमाम प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.