Haryana Violence: काही दिवसांपूर्वी(31 जुलै) हरियाणातील नूहमध्ये धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात दगडफेक, गोळीबार आणि लुटमारीच्या घटनाही घडल्या. यादरम्यान दंगलखोरांनी दुकाने आणि गोदामांची तोडफोड केली. नूह येथील सुनील मोटर्सच्या दुचाकीच्या गोदामावरही हल्ला झाला. यादरम्यान सुमारे 150-200 बाईक लुटण्यात आणि जाळण्यात आल्या.
सुनील मोटर्स बाईकचे मालक संजय बन्सल यांनी सांगितले की, नूह हिंसाचारात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी शेकडो दुचाकी चोरुन नेल्या किंवा जाळल्या. काही दिवसांनंतर सुरक्षा दलांनी विविध ठिकाणातून शेतातून दुचाकी जप्त केल्या. तर काही दुचाकी पाण्यात साचलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
सुनील यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या गोडाऊनचा चौकीदार हारून आहे. हिंसाचाराच्या दिवशी लोकांनी गोडाऊनवर हल्ला केल्यानंतर हारूनने पळ काढून आपला जीव वाचवला. यानंतर जमावाने त्यांच्या गोडाऊनवर हल्ला करुन दुचाकी लुटल्या. सुनील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
31 जुलै रोजी हिंसाचार भडकला31 जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. यादरम्यान, शेकडो गाड्या पेटवल्या, पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. नुहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला, वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. नूह हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
नूह, फरीदाबाद, पलवलसह अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले. याशिवाय नूहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. हरियाणातील हिंसाचार संदर्भात 142 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत, तर 312 जणांना अटक करण्यात आली आहे. एकट्या गुरुग्राममध्ये हिंसाचाराच्या संदर्भात 37 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत 70 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 93 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.