चंदीगड : बलात्काराच्या गुन्ह्यात डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहीमला वीस वर्षे कारवास सुनावण्यात आल्यानंतर डेरा समर्थकांच्या हिंसाचाराने धुमसणाºया हरियाणा आणि पंजाबमध्ये मंगळवारी शांतता होती. हिंसाचारग्रस्त भागातील जनजीवन हळुवारपणे सर्वसामान्य होत असून, या दोन्ही राज्यांत कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. दरम्यान, सिरसा येथील संचारबंदी मंगळवारी सकाळी सात वाजेपासून बारा तासांसाठी शिथिल करण्यात आली. पंजाबमधील भटिंडा, पटियाला आणि मोगा या जिल्ह्यांतील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. हिंसाचार, जाळपोळीचे प्रकार घडू नयेत म्हणून या दोन्ही राज्यांत अतिसतर्कतेचा आदेश कायम आहे. हरियाणातील सात संवेदनशील जिल्ह्यांत बुधवारी रात्री बारापर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. डेराच्या सदस्यांना डेराच्या जुन्या मुख्यालयातून काढले जात आहे.
डेराच्या परिसरातून १८ मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रभजोत सिंग यांनी सांगितले. या सर्व १८ मुली अल्पवयीन असून, त्यांची येथून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आम्ही डेरा व्यवस्थापनाच्या मदतीने त्यांना बाहेर आणले. त्यांना हरियाणातील बाल अभिरक्षणगृहात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबाच्या साम्राज्यात सिनेमागृह ते फिल्मी सेटसिरसास्थित डेराच्या विस्तीर्ण परिसरात गुरमीत राम रहीमने थाटलेल्या अलिशान साम्राज्याच्या सुरस कथाही आता ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. ऐशआरामाच्या सर्व सुविधांनी सज्ज अशा या संकुलात चित्रपटगृह आहे. याच चित्रपटगृहात गुरमीत राम रहीमचे चित्रपट दाखविले जात. याच भव्य परिसरात त्याने एक आकर्षक फिल्मी सेटही उभारला होता. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गुरमीतच्या आॅनलाइन गुरुकुल चित्रीकरण केले जात होते. एमएसजी: मेसेंजर आॅफ गॉड, एमएसजी-२, जट्टू इंजिनिअर आणि ‘हिंद का नापाक को जवाब’सह त्याच्या चित्रपटाचे शूटिंग याच परिसरात करण्यात आले होते.राम रहीम रात्री जेवला नाहीरोहतक : दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर रोहतक येथील सुनरिया तुरुंगात रवानगी करण्यात आलेल्या गुरमीत राम रहीमने सोमवारी रात्री जेवणच केले नाही; परंतु थोडे पाणी घेतले. मंगळवारी सकाळी दूध घेतले होते. बाबा राम रहीम कोणाशीही बोलला नाही. बराकीत येरझरा मारत होता.