Himani Narwal Death Case: हरियाणाच्या रोहतकमधील काँग्रेसची महिला नेता हिमानी नरवाल हिच्या हत्या प्रकरणात हरियाणा पोलिसांन मोठं यश मिळालं आहे. हिमानी नरवाल हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे रविवारी रात्री दिल्लीतून दोन जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून सर्व पक्षीय नेत्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे हिमानीच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील येणार असून हत्या कशी झाली हे समोर येणार आहे.
काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येने संपूर्ण हरियाणा हादरला आहे. हिमानी नरवालचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली. रोहतक इथल्या सांपला शहराच्या बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला होता. हिमानीच्या गळ्यात ओढणी बांधलेली होती आणि हातावर मेंदीच्या खुणा होत्या. हिमानी नरवाल युवक काँग्रेस रोहतक ग्रामीणची जिल्हा उपाध्यक्षा होती. भारत जोडो यात्रा यात्रेदरम्यान, हिमानीने जबाबदारी चोख पार पाडली होती. हिमानीचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. रोहतक पोलिसांची चार पथके या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. या खून प्रकरणाचा वेगवेगळ्या पैलूंनी तपास केला जात आहे. सध्या कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. हिमानीचा फोन जप्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे. या खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक रजनीश कुमार यांनी दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांनी हिमानी नरवालच्या मारेकऱ्याला अटक केली आहे. मारेकऱ्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने पोलिसांना हिमानी मला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो, असं म्हटलं. मारेकऱ्याने स्वत:ला हिमानीचा प्रियकर असल्याचे सांगितले आहे. हिमानीसोबत तो बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान या प्रकरणी हिमानीच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. "लोक माझ्या मुलीचा द्वेष करायचे. लोकांना वाटायचं की, ती इतक्या लहान वयात इतकी पुढे कशी गेली. मुलीच्या हत्येमागे पक्षातील एखाद्या सदस्याचा हात असल्याचा संशय आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कारण माझ्या मुलीने इतक्या लहान वयात पक्षासाठी जीव पणाला लावला होता," असं हिमानीच्या आईने म्हटलं.