हरियाणाच्या मेवात-नूह येथील दंगलीनंतर आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. दंगलीच्या प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी नूहमध्ये रोहिंग्या आणि अवैध घुसखोरांवर मोठी कारवाई केली आहे. तावडू रोहिंग्यांचा अवैध धंदा आणि अवैध घुसखोरांवर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या लोकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर रोहिंग्यांनी हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर सुरुवातीच्या तपासात हे लोक हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आले. अशा स्थितीत पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अवैध अतिक्रमणावर बुलडोझर फिरवला.
हरियाणातील हिंसाचाराच्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी तीव्र कारवाई केली आहे. आतापर्यंत ५ जिल्ह्यांमध्ये ९३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. १७६ जणांना अटक करण्यात आली आहे. एकट्या नूहमध्ये ४६ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय नूहचे पोलीस अधिकारी वरुण सिंगला यांचीही बदली करण्यात आली आहे. सोशल मीडियावर फिरणारे २३०० व्हिडिओ पोलिसांनी ओळखले आहेत. हिंसाचाराला चिथावणी देण्यात या व्हिडिओंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांचे मत आहे.
नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ एफआयआर नोंदवले आहेत. सोशल मीडियावरील पोस्टबाबत पोलिसांनी कलम-१५३, १५३A,२९५A,२९८, ५०४, १०९ आणि २९२ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मात्र, शायर गुरू घंटल नावाचे अकाऊंट कोण चालवत होते, याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही. पोलीस अशा सुमारे २३०० व्हिडिओंचा तपास करत आहेत, जे हिंसाचार पसरवण्यास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
हरियाणा सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव TVSN प्रसाद यांनी जनतेला आश्वासन दिले की बाधित भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. या भागात तुरळक घडामोडींवर कारवाई केली जात आहे. ते म्हणाले की, सरकार पुरेशा सैन्यासह पूर्णपणे तयार आहे. राज्यभरात निमलष्करी दलाच्या २४ कंपन्या तैनात आहेत. नूहमध्ये कर्फ्यू सुरू आहे. याशिवाय इंटरनेटही बंद आहे. नूह व्यतिरिक्त फरिदाबाद, पलवल, सोहना, पटौडी आणि गुरुग्रामच्या मानेसरमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नूह, सोहना आणि गुरुग्राममधील मुस्लिम समुदायाने घरी नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकाऱ्याने वाचवले ३५ जणांचे प्राण
मुबारिकपूर गावात राहणारा आबिद हुसेन अधिकारी आहेत. ते नूह बसस्थानकाजवळ फौजदार ओंबीर यांच्यासोबत उभे होते. तेव्हाच त्यांना माहिती मिळाली की, काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी काही लोकांना ओलीस करून एका धार्मिकस्थळी कोंडून ठेवले आहे. माहिती मिळताच ते ओंबीर आणि इतर पोलिसांसह पोहोचले. ते पोहोचताच हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार सुरू केला. ओलिसांना वाचवण्यासाठी आबिद हुसेन धावले. काही मिनिटांचाही उशीर झाला असता तर किमान ३५ जणांचा जीव धोक्यात होता.