चंडीगड : हरियाणात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता दोन उपमुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आहे. सूत्रांच्या हवाल्याने माजी गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. अनिल विज हे आज दुपारी चंडीगडमध्ये झालेल्या भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर ते अंबालाकडे रवाना झाले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता अनिल विज यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांच्या नावावर अनिल विज खूश नव्हते. या कारणास्तव त्यांनी बैठक सोडली. बैठकीनंतर अनिल विज हे सरकारी वाहन आणि ताफा सोडून खासगी वाहनाने अंबाला येथील आपल्या घरी गेले. यादरम्यान त्यांनी अंबाला येथून दप्पड टोल प्लाझा येथे आपली कार मागवली आणि नंतर स्वत: चालवत घरी निघून गेले.
जेजेपीसोबतची लोकसभा जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच भाजपाच्या हरियाणा सरकारने राजीनामा दिला होता. आता भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार असून मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान, जेजेपीसोबतची चार वर्षे जुनी युती तुटल्याने सरकार कोसळले आहे. जेजेपी नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिल्लीत भाजपा प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली. वृत्तानुसार, याच बैठकीत भाजपाने जेजेपीसोबत लोकसभेची एकही जागा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, जेजेपीला लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याने युती तुटली. आता चौटाला अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी या दोन नेत्यांची भेट होणार आहे.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत हिसारची जागा जिंकण्यासाठी कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई हिसारच्या आदमपूरमधून पहिल्यांदाच आमदार झाला आहे. कुलदीप बिश्नोई आधी येथून आमदार होते आणि नंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती.