५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:00 PM2024-09-18T16:00:40+5:302024-09-18T16:05:57+5:30
Haryana polls : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तरुण, वृद्ध, महिला आणि अपंगांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
Haryana polls : चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज, २५ लाखांपर्यंत मोफत उपचार आणि शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली जाईल, असे आश्वासन पक्षाने दिले आहे.
याचबरोबर, शेतकऱ्यांच्या पिकाचे काही नुकसान झाल्यास त्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल. महिलांसाठी एक मोठी घोषणा करत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा २ हजार रुपये देण्यासोबतच ५०० रुपयांना गॅस सिलिंडरही देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली आहे की, सत्तेत आल्यास वृद्ध, अपंग आणि विधवांना सहा हजार रुपये पेन्शन दिली जाईल. तसेच, OPS लागू करण्याबाबतही काँग्रेसने म्हटले आहे.
जाहीरनाम्यात जातीय सर्वेक्षणाचा मुद्दा सुद्धा मांडला आहे. तसेच, क्रिमी लेयरची मर्यादा १० लाख रुपये करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, ड्रग्जमुक्त हरियाणाचा नारा देत काँग्रेसने भरती कायद्यांतर्गत २ लाख कायमस्वरूपी भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तरुण, वृद्ध, महिला आणि अपंगांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | Delhi | Congress President Mallikarjun Kharge says, "We are announcing 7 guarantees that we will fulfil once we form government in Haryana... We have divided our 7 promises into 7 sections. Women will be given Rs 2000 every month. We will give Rs 500 every month for gas… pic.twitter.com/GuJUvlqKqC
— ANI (@ANI) September 18, 2024
दरम्यान, राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात १० वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीच्या जोरावर काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकून जननायक जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेपासून दूर होते. यावेळी भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, या निवडणुकीत कोणाला सत्ता मिळणार, हे ९ ऑक्टोबरला येणारा निकालच सांगेल.