Chandrababu Naidu : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी(9 ऑक्टोबर 2024) जाहीर झाले. भाजपने हरयाणामध्ये पूर्ण बहुमत मिळवले आहे, तर जम्मू-काश्मीरमध्येही विक्रमी 29 जागा जिंकल्या. तर, या दोन्ही राज्यात काँग्रेसने अतिशय खराब कामगिरी केली. दरम्यान, भाजपच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल एनडीएच्या मित्रपक्षांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी तर आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबाबत मोठे भाकीत केले आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही निकालाची पुनरावृत्ती होईल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मला खात्री आहे की, आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल हरियाणाप्रमाणेच असतील. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले 'एक राष्ट्र एक निवडणूक'ला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले. वारंवार निवडणुकांमुळे विकास कार्यात अडथळा येतो, असा तक्र त्यांनी यावेळी मांडला.
नितीशकुमार यांनीही अभिनंदन केलेहरियाणात भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अभिनंदन केले. नितीश कुमार म्हणाले- भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. जेडीयूचे खासदार आणि केंद्रीय मंत्री लालन सिंह यांनीही म्हटले की, हरियाणा निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले की, पंतप्रधान मोदी अजूनही देशात लोकप्रिय आहेत आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवनस वाढत आहे.