सोनीपत - प्रत्येक क्षेत्रात आज महिलावर्ग महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. उत्तुंग असे शिखर गाठत आहेत. मात्र हरियाणातील सोनीपत येथे महिलांनी समाजात कसे वावरावे, याबाबतचे समज अद्यापही बदललेले नाहीत. सोनीपतमधील एका गावामध्ये तरुणींच्या जीन्स व मोबाइल वापराला विरोध दर्शवण्यात येत आहे. जीन्स व मोबाइलच्या वापरामुळे मुली भरकटतात आणि मुलांसोबत पळून जातात, असे येथील लोकांचं म्हणणे आहे. मुलींच्या जीन्स-मोबाइल वापराविरोधात पंचायतीनं तालिबानी फतवा काढला आहे.
संपूर्ण गाव या निष्कर्षाचे समर्थन करत असल्याची माहिती गावच्या सरपंचानं दिली आहे. गावातील मुलींनी जीन्स व मोबाइलचा वापर करायचा नाही, असा तालिबानी फतवा गोहानाच्या जवळील गाव ईशापूर खेडीतील पंचायत समितीनं काढला आहे. हा फतवा काढण्यामागील पार्श्वभूमीदेखील अजबच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तीन प्रकरणांत मुलींनी प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले आणि तिन्ही मुली जीन्स व मोबाइलचा वापर करायच्या, असा हास्यास्पद तर्क पंचायत समितीनं लावला आहे.
'मुलींच्या पळून जाण्याला मोबाइल जबाबदार'सरपंच प्रेम सिंह यांचे म्हणणे आहे की, ईशापूर खेडी येथे गेल्या दोन-तीन घटनांमध्ये मुली आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. मुलींच्या पळून जाण्यानं पंचायतीची बदनामी झाली आणि यामुळे पंचायतच्या बैठकीत या घटनेला मोबाइलला जबाबदार ठरवण्यात आले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे अनेक तुघलकी फतवे हरियाणातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये काढले जातात.