ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला वयाच्या 82 व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तिहार तुरुंगातून त्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले ओम प्रकाश चौटाला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. कैद्यांनाही दहावी-बारावीची परिक्षा देता यावी यासाठी एनआयओएसने तिहार तुरुंगात परिक्षा केंद्राची व्यवस्था केली होती.
बारावी उर्तीण झाल्यानंतर चौटाला आता पुढच्या पदवी शिक्षणाचा विचार करत आहेत. 23 एप्रिलला त्यांनी पेपर दिला त्यावेळी ते पॅरोलवर बाहेर होते. परिक्षा केंद्राची व्यवस्था तुरुंगात केल्याचे समजल्यानंतर त्यांनी तुरुंगात जाऊन उर्वरित पेपर दिले अशी माहिती अभय सिंह चौटालाने दिली. ते ओम प्रकाश चौटालांचे सुपूत्र आणि हरयाणा विधानसभेचे विरोधीपक्षनेते आहेत.
ओम प्रकाश चौटाला ए ग्रेडने परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तुरुंगवासाच्या दिवसांमध्ये त्यांनी नव्या गोष्टी शिकायचे ठरवले आहे. ते जेलच्या ग्रंथालयात रोज जातात. तिथे जाऊन ते नियमितपणे वर्तमानपत्र, पुस्तके वाचतात. त्यांनी तुरुंग प्रशासनाला त्यांच्या आवडत्या पुस्तकांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. तुरुंगात ते जगातील बडया राजकीय नेत्यांची पुस्तके वाचतात. काहीवेळा ते आम्हालाही पुस्तके पाठवायला सांगतात अशी माहिती अभय सिंह चौटाला यांनी दिली.
सन 2000 मध्ये हरयाणामध्ये 3206 कनिष्ठ शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला. शिक्षक नियुक्तीमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी ओम प्रकाश चौटाला, त्यांचा मुलगा अजय चौटाला आणि अन्य 53 जणांना सत्र न्यायालयाने 2013 मध्ये दोषी ठरवले. सुप्रीम कोर्टाने 2015 मध्ये सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.