चंडीगड : हरयाणाचे मुद्रण आणि सामग्री राज्यमंत्री संदीप सिंह यांनी पॉलिग्राफी चाचणी करण्यास नकार दिल्याची माहिती त्यांचे वकील दीपक सभरवाल यांनी दिली. या प्रकरणी शुक्रवारी चंडीगड न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाचा सविस्तर आदेश आल्यानंतरच उत्तर देता येईल, असे पीडितेच्या वकिलाने सांगितले.
संदीप सिंग यांच्या वकिलाने सांगितले की, पॉलीग्राफी चाचणीचा पुरावा म्हणून वापर करता येत नाही, त्यामुळे तणाव वाढतो. केवळ तपासात दिरंगाई करण्यासाठी आणि मंत्र्यांना त्रास देण्यासाठी पॉलिग्राफी चाचणी केली जात आहे. ते म्हणाले की, संदीप सिंग यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून ही चाचणी करण्यास नकार दिला आहे.
कनिष्ठ महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून चंडीगड पोलिसांनी संदीप सिंग यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी सांगितले की, पीडित आणि आरोपी मंत्री यांच्या वक्तव्यात खूप तफावत आहे, अशा परिस्थितीत संदीप सिंग यांची पॉलिग्राफी चाचणी करणे आवश्यक आहे.
संदीप सिंग यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, पॉलिग्राफी चाचणीला नकार देणे त्याच्याविरोधात जाणार नाही. कारण पॉलिग्राफी चाचणीचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही. संदीप सिंग हे दोनदा तपासात सामील झाले असून, पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा २०२ प्रश्न विचारले, तर दुसऱ्यांदा ७० प्रश्न विचारण्यात आले. पुरावे गोळा करण्यात पोलिसांना अपयश आल्याने पॉलिग्राफी चाचणी करून घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला.