लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच ईडीने कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानात सभा घेऊन आवाज उठवला होता. दरम्यान, न्यायालयाने केजरीवाल यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आता अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या ओपिनियन पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर इंडिया टीव्हीकडून हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार ईडीने केजरीवाल यांना केलेल्या अटकेमुळे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला सहानुभूती मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच येथील लोकसभेच्या सात पैकी सात जागा भाजपा जिंकेल, असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. याआधी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्येही भाजपाने दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या.
तर आम आदमी पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या पंजाबमधील ओपिनियन पोलही समोर आला असून, लोकसभेच्या १३ जागा असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी ३ जागा मिळू शकतात. त्याबरोबरच शिरोमणी अकाली दल पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागू शकते, असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.