नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक कामकाज ठप्प असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे अनेक उद्योजक, कामगार, मजूर, गरीब वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्राने अशा लोकांना दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान योजनेतंर्गत ९.१३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार २५३ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर याची तक्रार सरकारने दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन करु शकता तसेच तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना हे कळवू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी सरकारचं अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जावून शोधू शकता. त्याशिवाय लाभार्थ्यांची यादी आणि ऑनलाईन अर्जदेखील दाखल करु शकता. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांची नवीन यादी या महिन्याच्या अखेर किंवा पुढील महिन्यात जारी करणार आहेत.
कशी कराल तक्रार?
- तुम्ही थेट कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर – १५५२६१, पीएम किसान टोल फ्री – १८००११५५२६, पीएम किसान लँडलाइन नंबर ०११-२३३८१०९२, २३३८२४०१ त्यासोबत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.
- जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहायचं असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ही सुविधा ऑनलाइन देखील प्रदान केली आहे.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते.
- शेतकऱ्यांना त्यासाठी pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल. या टॅबमध्ये शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल
- ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल त्यांची नावेही राज्य / जिल्हावार / तहसील / गावानुसार पाहता येतील. यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याचीही माहिती मिळू शकेल.
- याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारेही शेतकर्यांना माहिती मिळू शकते. याखेरीज पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात स्वत: ला अद्ययावत ठेवायचे असेल तर त्यांची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून आपण गुगल प्ले स्टोअरवरुन पंतप्रधान किसान मोबाइल अँप डाउनलोड करू शकता.
शेतकरी असूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही का?
मोदी सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान-किसान योजना लागू केली असेल पण काही लोकांसाठी योजनेत अटी घालण्यात आल्या आहेत. जे लोक या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील ते आधार पडताळणीतून उघड होईल. योजनेसाठी सर्व १४.५ कोटी शेतकरी कुटुंबे यासाठी पात्र आहेत. पती-पत्नी आणि १८ वर्षांपर्यंतची मुले एकच गणली जातील. ज्यांची नावे १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत भूमी अभिलेखात सापडतील ते योजनेस पात्र असतील.
खासदार, आमदार, मंत्री आणि महापौरांना याचा लाभ मिळणार नाही. भलेही ते शेती करत असतील म्हणून त्यांनी अर्ज केला असेल तर पैसे येणार नाहीत. मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / ड वर्ग कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केंद्र किंवा राज्य सरकारमधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला लाभ मिळणार नाही. जर अशा लोकांना फायदा झाला तर आधारमधून ते उघडकीस येईल.
व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील, आर्किटेक्ट जे शेती करत असतील तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. इन्कम टॅक्स भरणारे आणि १० हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही. जर कोणत्याही आयकर दात्याने योजनेचे दोन हप्ते घेतले असतील तर तो तिसऱ्यावेळी तो पकडला जाईल. कारण आधार पडताळणी होत आहे.