गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सरकारने हॅट्रीक केली आहे. आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदींनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आत्मविश्वास भारताच्या विकास आणि सुधारणांवरील नवीन विश्वास दर्शवतो. अनेक देशांतील सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतू भारतातील परिस्थिती वेगळी आहे. सध्याची सुरु असलेली प्रगती आणि स्थिर प्रशासनासाठी तरुण, महिलांनी मतदान केले आहे, असे मोदी म्हणाले.
नुकत्याच घसरलेल्या जीडीपीवरून भाष्य करताना मोदी म्हणाले की भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात जगातील अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढल्या तर भारताची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली. आम्ही खूप लांब झेप घेण्याची तयारी करत आहोत, असाही दावा मोदी यांनी केला. आम्ही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे मोदी म्हणाले.
सुधारणा, कार्य करा आणि परिवर्तन हा मंत्र सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. यानुसार अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.