नवी दिल्ली - गेल्या काही काळापूर्वी देशात असहिष्णुता वाढत असल्याच्या चर्चेनं वातावरण तापलं होतं. अनेक ठिकाणी मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याच्याही घटना समोर आल्या होत्या. त्यावर आता मानवाधिकारांच्या संरक्षणाची दखल घेणाऱ्या अॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियानं एक धक्कादायक अहवाल तयार केला आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या ताज्या अहवालानुसार भारतात गेल्या सहा महिन्यांत हेट क्राइम(द्वेष-तेढ पसरवणाऱ्या)च्या 100 घटना समोर आल्या आहेत. या हेट क्राइमचे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि तृतीयपंथीय लोक शिकार झाले आहेत. हेट क्राइमच्या यादीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत हेट क्राइमचे 18 प्रकार समोर आले आहेत. तर 13 घटनांसह गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत हेट क्राइमचे 8 प्रकार उजेडात आले आहेत. तर तामिळनाडू आणि बिहारमध्ये या दोन्ही राज्यांत अनुक्रमे हेट क्राइमच्या 7 घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशमधल्या हापूरमध्ये लिंचिंगच्या एका प्रकरणात चौकशी सुरू असतानाच हा अहवाल समोर आला आहे.
हापूर येथे जून महिन्यात मोहम्मद कासीम नावाच्या व्यक्तीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर मारहाणीतून बचावलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीनं पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतरही पोलिसांनी लिंचिंगऐवजी रस्त्यावरच्या भांडणातून त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगत दुर्लक्ष केलं. दादरीमध्ये झालेल्या मोहम्मद अखलाखच्या हत्येनंतर मानवाधिकारांचं संरक्षण करणाऱ्या संघटनांनी देशभरातल्या गुन्ह्यांशी निगडित प्रकरणांचा अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर 2015मध्ये दादरीला वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अखलाखनं घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरून स्थानिक लोकांनी त्याची हत्या केली होती. या प्रकारानंतर तीन वर्षांत देशभरात हेट क्राइमची 603 प्रकरणं समोर आली होती. अॅमनेस्टीनं स्वतःच्या वेबसाइटवर 'हॉल्ट द हेट'मध्ये या प्रकरणांचा उल्लेख केला आहे.
वर्ष 2018च्या सहा महिन्यांत घडलेल्या हेट क्राइमच्या घटनांवरून अॅमनेस्टीनं हा अहवाल तयार केला आहे. या रिपोर्टनुसार, देशभरात दलितांविरोधात अन्यायाची 67 आणि मुस्लिमांविरोधात 22 प्रकरणं समोर आली आहेत. अॅमनेस्टीनं दखल घेतलेल्या गुन्ह्यांमध्ये गोहत्या आणि ऑनर किलिंगचे प्रकार समोर आले आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडच्या भागात हेट क्राइमच्या घटना सर्वाधिक घडल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जाती- धर्माच्या नावाखाली बऱ्याचदा हिंसाचार उफाळून आला आहे. मेरठ, मुज्जफरनगर, सहारनपूर आणि बुलंदशहरमध्ये दलितांवरच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकर पटेल यांच्या मते, हेट क्राइमच्या घटना या भेदभावातून घडत असतात. परंतु कायद्यात सगळ्याच घटना हेट क्राइमच्या चौकटीत बसत नाहीत. पोलिसांनी अशा प्रकारांची चौकशी करून योग्य अहवाल द्यावा. जेणेकरून अत्याचाराच्या प्रकरणांत घट होईल.