नवी दिल्ली: ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईशा फाउंडेशनने ‘तणाव व्यवस्थापन आणि सर्वांगीण कल्याणासाठी योग’ हा कार्यक्रम भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडच्या मदतीने सुरू केला आहे. याअंतर्गत नऊ राज्यांमध्ये २३ ठिकाणी दहा हजार सैनिकांना शास्त्रीय हठयोग प्रशिक्षण देण्यात येईल. खूप जास्त तणाव व कठीण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैनिकांचे सर्वांगीण कल्याण घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी व्हिडीओ संदेशाद्वारा म्हटले की, ‘सैनिक म्हणून तुम्ही शारीरिक क्षमतेसाठी पुरेशी मेहनत घेतलेली आहे पण एका वेगळ्या प्रकारच्या मानसिक आणि ऊर्जा स्तरावरच्या क्षमतेसाठी तुम्हाला योग अभूतपूर्वपणे उपयुक्त ठरेल. योगाद्वारे तुमचे अगदी मूलभूत स्तरावर कल्याण साधले जाईल. आम्ही यापूर्वीही विविध योग हजारो सैनिकांना शिकवले असून, ३०० पेक्षा जास्त सैनिकांना प्रशिक्षक म्हणून देखील तयार केले आहे. सैन्याचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दक्षिण कमांडला आता आम्ही प्रशिक्षण उपलब्ध करीत आहोत. दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी याप्रसंगी भारतीय सैन्याच्या मानसिक आरोग्यासाठी योग कसा महत्त्वपूर्ण राहील यावर भाष्य केले.