लखनौ - हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीच्या गावी जाऊन तिच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर आप पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या अंगावर एका व्यक्तीने शाई फेकली. त्यांना काळे फासण्याचा या हल्लेखोराचा इरादा होता. मात्र, त्यातून संजय सिंह बचावले. सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. शाई फेकणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
हाथरसमधील दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराने देश हादरला असून अनेक राजकीय पक्षांचे नेते हाथरसमधील पीडित कुटुंबीयांच्या भेटीला जात आहेत. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत, याप्रकरणी न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही या नेत्यांकडून होत आहे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीच्या चंद्रशेखर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते सोमवारी हाथरस येथे पोहोचले, खासदार संजय सिंह यांच्यासमेवत इतरही पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर बाहेरील जमावापैकी एकाने खासदार सिंह यांच्या अंगावर काळी शाई फेकून विरोध केला. सिंह यांच्यासमवेत आम आदमी पक्षाचे राखी बिड़लान आप आमदार दिल्ली, राजेंद्र पाल गौतम, दिल्ली सामाजिक न्याय मंत्री, हरपाल सिंह चीमा, एलओपी नेता हजर होते. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच, आत्तापर्यंत महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष दिले नसल्याबद्दल संतापही व्यक्त केला आहे.
भाजपा खासदाराने आरोपींची भेट घेतली?
दलित तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चौघांची भाजपचे स्थानिक खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताने हे प्रकरण दडपण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आपण आरोपींना भेटलो नाही, कारागृहासमोरून जाताना तिथे काही लोक भेटले. त्यांच्याशी मी बोलत असल्याचे कळताच जेलर बाहेर आले. त्यांनी मला चहाचा आग्रह केला, म्हणून मी आत गेलो. तिथे कोणाही आरोपीची भेट घेतली नाही, असा खुलासा खा. दिलेर यांनी केला आहे. हाथरस हा अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ असून, तेथून दिलेर निवडून आले आहेत.
फॉरेन्सिक अहवाल निरर्थक ठरतो
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर अकरा दिवसांनी फॉरेन्सिक परीक्षणासाठी नमुने गोळा करण्यात आले होते. त्यामुळे त्यावर आधारित फॉरेन्सिक अहवाल निरर्थक ठरतो, असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अझीम मलिक यांनी म्हटले आहे. दलित मुलीवर बलात्कार झालेला नाही असे उत्तर प्रदेशचे पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे सांगत आहेत. बलात्काराची घटना घडल्यानंतर ९६ तासांच्या आत तपासणीसाठी गोळा केलेल्या नमुन्यांतच खरा पुरावा सापडू शकतो, असे याबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. त्यामुळे ११ दिवसांनंतर गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे तयार केलेला अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असेही डॉ. अझीम मलिक यांनी सांगितले.