हाथरस : हाथरस येथील दलित मुलीवर बलात्कार करणाऱ्यांपैकी मुख्य आरोपीच्या संपर्कात आपण कधीही नव्हतो, असे या मुलीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. खोट्यानाट्या गोष्टीत आम्हाला गोवण्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा डाव आहे, असा आरोप बलात्कारपीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. गेल्या पाच महिन्यांत मुख्य आरोपी संदीप ठाकूर व या कुटुंबियांमध्ये दूरध्वनीवर १०० कॉलदरम्यान बोलणे झाल्याची माहितीही खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दलित मुलीच्या एका भावाने यासंदर्भात सांगितले की, आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्याचसाठी खोट्या फोन कॉलचा हवाला देऊन प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे.आमच्या घरी वडिलांनी १० वर्षांपूर्वी मोबाईल घेतला; पण त्याचे सीमकार्ड माझ्या नावावर आहे. आमच्याकडे एकच फोन असून, तो नेहमी घरात ठेवलेला असतो. माझे वडील तो फोन सर्वात जास्त वापरतात; पण बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूरशी फोनवरून आपण कधीही बोललेलो नाही, असे माझ्या वडिलांनी सांगितले आहे.मुख्य आरोपी संदीप व दलित मुलीच्या कुटुंबातील लोकांचे फोनवरून झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ फिती व्हायरल झाल्या आहेत. दलित मुलीच्या धाकट्या भावाने सांगितले की, पीडित मुलगी अशिक्षित असून, तिला मोबाईल कसा हाताळायचा हेही माहीत नव्हते. ती मोबाईलवरून कॉल करायची नाही, तर आलेले कॉल घ्यायची. त्यामुळे तिने मुख्य आरोपी संदीप याला फोन केला असण्याची शक्यताच नाही, असेही तिच्या धाकट्या भावाने म्हटले आहे.‘त्या’ मुलीशी माझी मैत्री त्यांना नापसंत : आरोपी संदीपजिच्यावर बलात्कार झाला, असे म्हटले जाते, त्या दलित मुलीबरोबर असलेल्या माझ्या मैत्रीला तिच्या घरच्या मंडळींनी खूप विरोध केला होता, असे या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.मला आणि आणखी तिघांना विनाकारण या बलात्कार प्रकरणात गोवण्यात आले आहे. आम्हा चौघांनाही न्याय मिळावा, अशी मागणी मुख्य आरोपी संदीप याने केली आहे. या मुलीला तिची आई व मोठा भाऊ, हे दोघेही त्रास देत होते, असा दावाही संदीपने केला आहे.
Hathras Case: खोट्या गोष्टींत गोवण्याचा पोलिसांचा डाव; दलित मुलीच्या कुटुंबियांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 1:08 AM