नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबविली. त्याअंतर्गत राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
"काही दिवसांपूर्वी मी हाथरसला गेलो होतो, जाताना मला अडविण्यात आले. दुसऱ्यांदा मी गेलो. त्यावेळी मला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून का रोखले गेले. त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर खून झाला. ज्यावेळी मी पीडित कुटुंबाशी बोललो, त्यावेळी सरकारने पीडितांवर हल्ले करण्यास सुरूवात केली," असे राहुल गांधींनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सरकारचे काम गुन्हेगारांचे रक्षण करणे नाही, यूपी सरकार पीडितांना न्याय देत नाही. यूपी सरकारने गुन्हेगारांना तुरूंगात टाकले पाहिजे. देशातील कोट्यवधी महिलांसोबत असे घडते, असे सांगत राहुल गांधी यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला. तसेच, आपल्याला समाज बदलला पाहिजे आणि माता-भगिनींसोबत जे काही केले जात आहे, तो अन्याय आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
याचबरोबर, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, "हाथरस घटनेत सरकारचे वागणे अमानवीय आणि अनैतिक आहे. पीडितेच्या कुटूंबाला मदत करण्याऐवजी ते गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चला, देशभरातील महिलांवर होणाऱ्या अन्यायविरूद्ध आवाज उठवूया - एक पाऊल बदलाच्या दिशेने."
राहुल गांधींच्या अगोदर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करून यूपी सरकारला लक्ष्य केले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी सुरुवातीला पीडित कुटुंबाची भेट घेण्यास राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसर्या राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यास परवानगी दिली होती.