नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र आज पुन्हा राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान राहुल गांधी आज दुपारी पुन्हा हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? - राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, मी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना मला पोलिसांनी अडवलं. त्यानंतर मी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे"
"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा आम्ही उन्नावच्या लेकीसाठी अशी लढाई लढत होतो" असं प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
"त्यांना इतिहास माफ करणार नाही"
"राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल" असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.