हाथरस (उत्तर प्रदेश) - हाथरसमध्ये एका तरुणींवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या प्रकणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपींच्या समर्थनार्थ पीडित तरुणीचे गाव आणि आसपासच्या गावातील सवर्ण जातींमधील लोक एकत्र होत आहेत. पीडित तरुणीच्या बुलगडी गावापासून जवळच शुक्रवारी सवर्ण जातीचे लोक एकत्र झाले. तसेच तेथे आयोजित झालेल्या जातपंचायतीमध्ये चारही आरोपींना या प्रकरणात फसवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला.इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पीडित तरुणीच्या गावापासून जवळच दोन ऑक्टोबर रोजी शेडको लोक गोळा झाले होते. यापैकी बहुतांश सवर्ण जातींमधील होते. एका महापंचायतीप्रमाणे ही पंचायत बोलावण्यात आली होती. या पंचायतीमध्ये चारही आरोपींना या प्रकरणात फसवण्यात येत असून, या प्रकरणाला जातीय रंग देण्यात आल्याबाबत बैठकीत एकमत झाले. त्यामुळे आरोपी तरुणांची बाजू मांडण्याचा आणि सध्या गावामध्ये कुठल्याही बाहेरील व्यक्तीला येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या प्रकरणाच्या तपासावर आपण संतुष्ट नसल्याचेही या लोकांनी सांगितले.दैनिक भास्करने याबाबत वृत्त देताना सांगितले की, या महापंचायतीसाठी १२ गावामधील लोक एकत्र झाले होते. सर्वण जातीमधील लोकांच्या या जातपंचायतीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की, पीडित तरुणीची आई आणि भावाची योग्य चौकशी केल्यास सत्य समोर येईल. ज्या तरुणांवर आरोप करण्यात आलाय ते पीडित तरुणी आणि तिच्या आईला पाणी पाजत होते, असा दावाही या लोकांनी केला आहे.राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतल. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.