लखनौ : हाथरस बलात्कार व मृत्यू प्रकरणातील तरुणीवर (१९) रात्री उशिरा करण्यात आलेले अंत्यसंस्कार हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून, त्यासाठी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले.
उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने राज्य सरकारला हाथरससारख्या परिस्थितीत अंत्यसंस्कार कसे केले जावेत, याचे मार्गदर्शन/नियम बनवण्याचा आदेश दिला. न्यायमूर्ती पंकज मिथाल आणि न्यायमूर्ती रंजन रॉय यांच्या खंडपीठाने या विषयाचे वार्तांकन आणि चर्चा करताना वृत्तपत्रे व वृत्त वाहिन्या बंधने व संयम पाळतील, अशी अपेक्षा केली. न्यायालयाने म्हटले की, मध्यरात्री अंत्यसंस्कार तेही विधी न करता, यामुळे तरुणीच्या तसेच तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्याही मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. त्या तरुणीवर चार जणांनीबलात्कार केल्यानंतर दिल्ली रुग्णालयात तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.