लखनऊ : हाथरस प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आणखी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, एसआयटी आज आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र, एसआयटीच्या पथकाने तपासासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ मागितली होती, याला उत्तर प्रदेश सरकारने मान्यता दिली आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका १० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. देशभरातून रोष वाढल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली. तसेच, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.
गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात तयार करण्यात आलेल्या एसआयटीममध्ये चंद्र प्रकाश आणि एसपी पूनम यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटीने आपल्या तपासादरम्यान पीडित कुटुंब, आरोपी, पोलीस प्रशासनासह 100 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.
कॉल रेकॉर्डमधून नवीन खुलासाया प्रकरणाला नवीन वळण आले आहे. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटीच्या चौकशीतून समोर येत आहे. समोर आलेल्या कॉल डिटेल्सनुसार ६२ कॉल हे पीडित कुटुंबाकडून करण्यात आले. तर ४२ कॉल हे आरोपी संदीपकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे.