उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. सत्संगादरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २५ महिलांसह २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारांसाठी एटा येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हाथरय येथील रतिभानपूर येथे भोले बाबांचा सत्संग सुरू होता. या सत्संगाचा समारोप होत असताना ही चेंगराचेंगरी झाली. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. याबाबत एटाचे सीएमओ उमेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, आमच्याकडे शवविच्छेदनासाठी आतापर्यंत २७ मृतदेह आले आहेत. त्यामध्ये २५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची अधिक माहिती चौकशीनंतर समोर येईल. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीमुळे ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.