Hathras Stampede ( Marathi News ) :उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल झालेल्या भोले बाबांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली असून या घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग दरवर्षी आयोजित केला जात होता. या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत होते. या सत्संगमध्येही मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित झाले होते. सत्संगमध्ये माती दिली जाते, ही माती घेण्यासाठी मोठी गर्दी असते. काल या मातीमुळेच चेंगराचेंगरी झाली.
हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
या चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह ११६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. आता या अपघाताबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.
'माती'साठी झाली चेंगराचेंगरी
काल झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास सुरू करण्यात आला आहे. या चौकशीत बाबा ज्या मातीत पाय ठेवतात त्या मातीला भाविक पवित्र मानतात. ती माती घरी आणल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. बाबांच्या मार्गावर रांगोळी सजवली जाते. बाबा त्यावरुन गेल्यानंतर महिला ती रांगोळीही घेतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. ही माती घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते.
या घटनेत महिलांचा सर्वात जास्त महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत माहिती देताना मुख्य सचिव मनोज कुमार सिंह म्हणाले, या अपघातात ११६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, यामध्ये ७ मुले आणि १ पुरुष वगळता सर्व मृतांमध्ये महिला आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही
सूरजपाल उर्फ भोले बाबा याच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. ही चेंगराचेंगरी इतकी होती की काही वेळातच मृतदेहांचा ढीग पडला होता. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्वजण सत्संगाला आले होते. या प्रकरणाचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेदार देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मात्र आता पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्या एफआयआरमध्ये प्रवचन देणाऱ्या भोले बाबाचेच नाव नाही.