उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात धक्कादायक घटना घडली. हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील फुलराई गावात बाबा हरिनारायण साकार उर्फ भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता. यानंतर चेंगराचेंगरी झाली आहे. याच दरम्यान आता भोले बाबांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. चेंगराचेंगरीमुळे खूप व्यथित झालो आहे, पण नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीही टाळू शकत नाही आणि सर्वांना एक दिवस मरायचं आहे असं म्हटलं.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भोले बाबांनी सांगितलं की, २ जुलैच्या घटनेपासून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि अत्यंत व्यथित झाले आहेत, पण जे घडायचं असतं ते कोण टाळू शकतं. जो जन्माला आला आहे त्याला एक दिवस जायचंच आहे. त्यांनी त्यांचे वकील ए.पी. सिंह यांच्या आधीच्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले, आमचे वकील डॉ. ए.पी. सिंह आणि प्रत्यक्षदर्शी यांनी ज्या विषारी स्प्रेबाबत सांगितलं ते पूर्णपणे सत्य आहे, काहीतरी कट सुरू होता.
सनातन आणि सत्याच्या आधारे चालणाऱ्या त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप देखील भोले बाबा यांनी केला. "आमचा एसआयटी (विशेष तपास पथक) आणि न्यायिक आयोगावर पूर्ण विश्वास आहे आणि 'मानव मंगल मिलन सद्भावना समागम'च्या सर्व अनुयायांनाही पूर्ण विश्वास आहे की ते शक्य ते सर्व प्रयत्न करून कट रचणाऱ्यांचा पर्दाफाश करतील" असं भोले बाबा यांनी म्हटलं आहे.
एसआयटीने राज्य सरकारला दिलेल्या रिपोर्टमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमागे कोणता तरी मोठा कट असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. एसआयटीच्या रिपोर्टमध्ये स्थानिक प्रशासनाकडून चूक झाल्याचं म्हटलं आहे. तसेच या चेंगराचेंगरीला आयोजकांना जबाबदार धरलं आहे. कारण त्यांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. त्यामुळेच सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.