हाथरस येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यूपी पोलिसांनी 'भोले बाबां'च्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली. आयजी शलभ माथूर यांनी सांगितलं की, सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी यांनी हाथरस घटनेबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पाठवलेल्या तीन मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या सत्संगात सुमारे एक ते दीड लाख लोक (भक्त) सहभागी झाले होते. मोठा मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यानंतर अचानक लोक बाहेर आले, पण बाहेर पडण्याचा गेट खूपच अरुंद होता आणि रस्त्यात एक नाला देखील होता. आजूबाजूला चिखल होता. याच दरम्यान, चेंगराचेंगरी होऊन लोक एकामागून एक नाल्यात पडले आणि सुमारे दीड ते दोन तास तेथेच दबले गेले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, मैदानात सत्संगचा मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यावर गुरुजींची गाडी निघाली. लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. अनेक जण एकावर एक पडले. दुर्घटनेनंतर लोकांनी तातडीने मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात नेलं. हाथरस येथील सिकंदरराव ट्रॉमा सेंटरच्या बाहेर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आणि बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकांमध्ये आणण्यात आलं. रुग्णवाहिका कमी पडल्या, तेव्हा लोक गाडय़ांमधून मृतदेह रुग्णालयात आणू लागले.
जखमींना तसेच जीव गमावलेल्यांना रुग्णालयात आणण्यासाठी स्ट्रेचरही पुरेसे नव्हते. हॉस्पिटलमध्ये सर्वत्र आरडाओरडा ऐकू आला. आधी सत्संगात इतके भाविक जमले की आयोजक आणि प्रशासनाची व्यवस्था कोलमडली, मग अपघातातील जखमींची संख्या इतकी वाढली की, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी वाहनं नव्हती. चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या एका आईने सांगितलं की, आम्ही दर्शनासाठी आलो होतो, खूप गर्दी होती, आम्ही बिट्टूला आमच्या मांडीवर घेत होतो. चेंगराचेंगरी झाली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाने चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचं योगी सरकारने सांगितले.
आयजी शलभ माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत आमच्याकडे ११६ मृत्यूची पुष्टी झाली आहे. काही जखमीही आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. एफआयआर नोंदवला जात आहे. ज्या आयोजकांनी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी घेतली आहे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येत आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.