हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेत १२१ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच दरम्यान नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. भोले बाबा यांचे एक-दोन नव्हे तर २४ आश्रम आहेत. त्यांचं १०० कोटींचं मोठं साम्राज्य आहे. भक्तांच्या मते बाबांनी एक रुपयाही दान म्हणून घेतलेला नाही. तरीही भक्तांची श्रद्धा आणि विश्वास यामुळे त्यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत.
भोले बाबा यांनी भक्तांकडून कोणतीही देणगी घेतली नसतानाही त्यांनी अतिशय हुशारीने अनेक ट्रस्ट तयार करून त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे बाबांनी देशातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेशात राजमहालासारखे आश्रमही बांधले. त्यांचं जवळपास १०० कोटींचं साम्राज्य आहे. यामध्ये मुख्यतः स्थावर मालमत्तेचा समावेश आहे, जी बाबांनी निर्माण केलेल्या ट्रस्टद्वारे खरेदी केली आहे.
देशभरात सुमारे २४ आश्रम असल्याचं आढळून आले आहे. २४ मे २०२३ रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टच्या नावावर केली होती आणि हा ट्रस्ट बाबांचे सर्वात विश्वासू सेवक चालवतात. ट्रस्टच्या माध्यमातून अमाप देणग्या जमा होतात. मैनपुरी आश्रमात लावण्यात आलेला बोर्ड पाहिला तर त्यामध्ये सर्व देणगीदारांची माहिती देण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ते २.५ लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांचा उल्लेख आहे
भक्तांच्या या देणगीतून बाबांनी आलिशान आश्रम बांधले आहेत, त्यातील प्रत्येक आश्रम कोट्यावधींचा आहे. या आश्रमाला थेट बाबांचे नाव नसले तरी हे राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टने बांधले आहे. कानपूरचा आश्रम एखाद्या आलिशान महालापेक्षा कमी नाही. आश्रमातील महागडे झुंबर आणि बाबांचे सिंहासन पाहण्यासारखे आहे. या आश्रमाप्रमाणे बाबांचे इतर आश्रमही आलिशान आहेत.
१०० कोटींच्या मालमत्तेचे मालक भोले बाबा यांच्या सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पिंक आर्मीची स्थापना केली आहे. ज्यामध्ये ५००० जण आहेत. यामध्ये १०० पर्सनल ब्लॅक कॅट कमांडो देखील सामील होते. बाबांचे सुरक्षा कवच मोठे होतेच, पण त्यांच्या वाहनांचा ताफाही चर्चेचा विषय बनला होता. या ताफ्यात अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे.