हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. २ जुलै रोजी हाथरस जिल्ह्यात नारायण साकार हरी म्हणजेच भोले बाबांच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अलीकडेच ३२०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. याप्रकरणी आता बसपा प्रमुख मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच भोले बाबांना सरकारचं संरक्षण आहे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. "उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोकांच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबा यांचं नाव नसणं हे राजकारण आहे. यावरून असं सिद्ध होतं की, अशा लोकांना राज्य सरकारकडून संरक्षण मिळतं, जे अनुचित आहे."
"मीडियाच्या म्हणण्यानुसार, या दु:खद घटनेबाबत २३०० पानांच्या आरोपपत्रात ११ जणांना आरोपी करण्यात आलं आहे, परंतु भोले बाबा यांच्याबाबत सरकारचं आधीसारखंच असलेलं मौन योग्य आहे का? या सरकारी वृत्तीने अशा घटना यापुढे थांबवता येणं शक्य आहे का? सर्वसामान्य जनता चिंतेत आहे" असंही मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात ११ जणांचा उल्लेख करण्यात आला असून, ज्यांनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. बचाव पक्षाचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी ३२०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर यांच्यासह १० आरोपींना अलीगड जिल्हा कारागृहातून हाथरस जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. एक आरोपी मंजू यादव अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सध्या बाहेर आहे. या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.