हाथरस : ‘सत्संग’ आटोपून सत्येंद्र यादव हा आपल्या वाहनाकडे जात असताना त्यांच्या पत्नीने त्यांना रडत रडत फोन करून सांगितले की, काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ‘छोटा’ मरण पावला आहे.
पेशाने ड्रायव्हर असलेला २९ वर्षीय यादव हा आपल्या आई आणि दोन वहिनी आणि कुटुंबासह विश्वहारी सत्संगासाठी दिल्लीहून आला होता. कार्यक्रम संपण्यापूर्वीच, तो, त्याची आई आणि मोठा मुलगा मयंक (४ वर्षीय) सोबत वाहनाकडे गेले होते. मात्र त्याच्या पत्नीने फोनवर मुलगा गेल्याचे सांगताच त्याला मोठा धक्का बसला.
रोविनच्या कुटुंबाप्रमाणेच इतर अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी या दुःखद घटनेत आपली मुले गमावली आहेत. भाऊ, बहिणीचा शेवटचा प्रवासआयुष (९) आणि काव्या (३) नावाच्या भाऊ आणि बहिणीसाठी, जयपूर ते कार्यक्रमस्थळापर्यंतचा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. त्यांच्या वडिलांना अद्याप ही बातमी सांगितलेली नाही. त्यांना मोठा आघात होईल, अशी भीती असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
बहिणीच्या शोधासाठी...चेंगराचेंगरीनंतर राकेशकुमार याची बहीण हरबेजी देवी या बेपत्ता आहेत. त्याने सांगितले की, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १००हून अधिक लोकांचे मी मृतदेह बघितले; पण त्यातूनही माझ्या बहिणीचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी आपल्या बहिणीच्या शोधासाठी हाथरस, इटाह, अलिगढ येथील शवागारेही पालथी घातली. मात्र तिथेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
मृत्यू नेमका कशामुळे?चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जवळपास सर्व प्रकरणांमध्ये गुदमरणे हे मृत्यूचे कारण असल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये बहुतांश ४० ते ५० वयोगटातील महिला आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.
चेंगराचेंगरी का?‘भोले बाबा’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुयायांना धक्का दिल्याने गोंधळ उडाला. पावसामुळे तेथे निसरडा उतार झाला होता, यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे (एसडीएमच्या अहवालातून समोर आले आहे. बाबांच्या पायाची धूळ त्यांच्या कपाळावर लावायला भक्तांनी सुरुवात केली, इतरही भक्त त्यांच्याकडे धावू लागले. यावेळी बाबांचे वैयक्तिक ब्लॅक कमांडोेंनी धक्काबुक्की केली. यात काही लोक खाली पडले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि जमाव नियंत्रणाबाहेर गेला. बहुतेक लोक उतारामुळे घसरले आणि पडले. जे पडले ते उठू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या लोकांमुळे ते चिरडले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.