संजय शर्मानवी दिल्ली : चेंगराचेंगरीत १२१ हून अधिक मृत्यू झाल्यानंतरही सरकार आणि विरोधक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून, यामागे व्होट बँकेचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
शिवकथेचे आयोजक भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, एफआयआरमध्येही त्याचे नाव नाही. याची संपूर्ण जबाबदारी सेवकांवर टाकली जात आहे. हाथरसचा मुद्दा आज संसदेत गाजला, पण विरोधी पक्षांचे नेतेही भोले बाबांऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. यूपीतील प्रमुख विरोधी पक्ष सपाचे नेते अखिलेश यादव यांनीही भोले बाबांऐवजी उत्तर प्रदेशातील दुसऱ्या बाबाला अटक करण्याची मागणी केली. भाजपचे नेतेही हाथरसच्या घटनेपासून दूर राहात आहेत.
असे आहे राजकारण? भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह यांच्यावर होणारी कारवाई रोखण्यासाठी त्यांचा समाज दबाव टाकत आहे. भोले बाबा हे जाटव समाजातील एक प्रतिष्ठित संत आहेत. मागासवर्गीयांत त्यांचा मोठा प्रभाव आहे. भोलेबाबांवर कारवाई झाली, तर जाटव, मागासवर्गीय समाज नाराज होण्याची शक्यता आहे. या समाजाची नाराजी कोणालाही नको आहे.