कासगंज जिल्ह्यातील बहादूर नगरमध्ये भोले बाबा यांनी २६ वर्षांपूर्वी आश्रम बांधला आहे. हा आश्रम दर मंगळवारी लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असायचा, सत्संग होत असे, मात्र सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता या दुर्घटनेनंतर शांतता पसरली आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही भोल बाबांवरील श्रद्धा कमी झाली नसून पुन्हा एकदा आश्रमात लोकांची गर्दी होईल, सत्संग होईल असं त्यांचे भक्त म्हणत आहेत. भक्त नरेश पाल यांनी सांगितलं की, हाथरसच्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी आहेत. हा एक कट असून काही लोकांनी मुद्दाम महिलांना धक्काबुक्की केली, त्यामुळे महिला पडल्या आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत भोले बाबांची चूक नाही.
फरिदाबादहून आलेल्या भोले बाबांच्या एका भक्ताने सांगितलं की, मी वेडी झाली होती पण भोले बाबांच्या संगतीत आल्यापासून पूर्णपणे बरी झाली आहे. देवाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे घडवून आणलं आहे. जेव्हा तिला विचारण्यात आलं की देव कुठे आहे, तेव्हा ती म्हणाली की येथे आहे, तो सर्वत्र आहे आणि आपण त्याला पाहू शकतो.
पलवल हरियाणातून आलेला भोले बाबांचा भक्त हरवीर सिंह सांगतो की, तो नारायण हरी परमात्मा यांचं दर्शन घेण्यासाठी आला होता. तो २०१६ पासून भोले बाबांशी जोडला गेला आहे. मी आधी दारू प्यायचो, मांसाहारी होतो. पण येथे आलो तेव्हा सर्व काही सोडलं. लाखो लोक येथे येत असत पण या दुर्घटनेमुळे ते घाबरले आहेत त्यामुळे कमी येत असल्याचं त्यांच म्हणणं आहे.