उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबा म्हणजेच नारायण साकार हरी यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच दरम्यान, भोले बाबांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. २३ वर्षांपूर्वी एका मृत्यू झालेल्या मुलीला जिवंत केल्याचा दावा केल्याप्रकरणी भोले बाबांना अटक करण्यात आली होती.
डिसेंबर २००० मध्ये भोले बाबा यांना सहा जणांसह अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला होता. त्यांनी मृत्यू झालेल्या मुलीला पुन्हा जिवंत करण्याची जादूई शक्ती असल्याचा दावा केला होता. एफआयआर डिटेल्समधून मिळलेल्या माहितीनुसार, भोले बाबांवर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ अंतर्गत २००० मध्ये आरोप करण्यात आला होता. त्यावेळी बाबांच्या भक्तांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला होता, त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि बाबांसह काही लोकांना अटक केली.
प्रत्यक्षदर्शी पंकजने दिलेल्या माहितीनुसार, भोले बाबा यांना मूल नाही, म्हणून त्यांनी कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आपल्या भाचीला दत्तक घेतलं होतं. एके दिवशी, मुलगी बेशुद्ध पडली आणि अनुयायांनी दावा केला की ते मुलीला चमत्कारिकरित्या बरं करतील. काही वेळाने मुलगी शुद्धीवर आली, पण त्यानंतर मात्र तिचा मृत्यू झाला. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बाबांसह 6 जणांना अटक
मुलीचा मृतदेह हा चबोतरा स्मशानभूमीत नेण्यात आला. पण भोले बाबा यांचे अनुयायी हे भोले बाबा येऊन मुलीला जिवंत करतील यावर ठाम होते. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना लाठीचार्ज करावा लागला. यानंतर भोले बाबा आणि त्यांच्या सहा अनुयायांना अटक करण्यात आली. मात्र, नंतर पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
पंकजच्या म्हणण्यानुसार, भोले बाबा यांचे अनुयायी नियमितपणे त्यांच्या आग्रा येथील घरी दर्शनासाठी येतात. काही वर्षांपूर्वी कासगंजला स्थलांतरित होण्यापूर्वी बाबांनी या घराचा आश्रम म्हणून अनेक वर्षे वापर केला होता. हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोले बाबा फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.