नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक भाषा आणि अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आलेल्या कालीचरणला आपल्या वक्तव्याचा कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसून येत आहे. कालीचरणने आणखी एक व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा नथुराम गोडसेला साष्टांग नमस्कार घातला आहे. तर, महात्मा गांधीबद्दल केलेल्या विधानामुळे एफआयआर दाखल झाल्याचा खेदही वाटत नसल्याचे कालीचरणने या व्हिडिओतून म्हटले आहे.
अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. तर, छत्तीसगडमध्ये कालीचरणविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पुन्हा एकदा व्हिडिओतून कालीचरणने गांधींचा द्वेष असल्याचं म्हटलंय. ''गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. याबद्दल मला पश्चाताप वाटत नाही. माझ्या मनात गांधींविरुद्ध तिरस्कार आहे, मी गांधींचा द्वेष करतो. याउलट मी गोडसेंना साष्टांग नमस्कार करतो, मी त्यांना महात्मा मानतो,'' असेही कालीचरणने म्हटले आहे.
कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल-
२६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कडक भूमिका
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही बघेल यांनी म्हटलं आहे.
दोषींवर कारवाई करणार - बघेल
आता एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भूपेश बघेल यांनी केला आहे. चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.