महाराजगंज : ऑफिसमधून रजा घेण्यासाठी कारणे शोधण्यात अनेकांनी आता पीएच. डी. मिळविली आहे. परंतु या बहाद्दरांमुळे अनेकदा खऱ्या गरजवंतावर अन्याय होण्याची शक्यता असते. असे असले तरी जिल्ह्यात नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या हवालदार गौरव चौधरींनी ज्या पोटतिडकीने रजेचा अर्ज लिहिला तो पाहून त्यांना तत्काळ १५ दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली.
‘लग्नानंतर माझा नुकताच गौना (पत्नीला लग्नानंतर प्रथमच माहेरून सासरी आणण्याची प्रथा) झाला. परंतु सुट्टी मिळत नाही. त्यामुळे पत्नी नाराज आहे, वारंवार फोन कट करतेय, अशी कैफियतच त्यांनी पत्रात मांडली होती.
गौरव चौधरीने एएसपींना अर्ज देऊन रजा मागितली. यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या नाराजीचा उल्लेख केला आहे. एवढेच नाही तर “मी माझ्या पत्नीला वचन दिले होते की, पुतण्याच्या वाढदिवसाला १० जानेवारीला नक्कीच घरी येईन. म्हणून, तुम्हाला विनंती आहे की, कृपया रजा मंजूर करा. मी तुमचा आभारी राहीन,” अशी विनंती त्यांनी केली होती.
अन् रजा मंजूर...
एएसपी आतिश कुमार सिंह यांनी सांगितले की, ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना त्यांच्या गरजेनुसार सुट्टी दिली जाते. सुट्टीमुळे शांतता व्यवस्थेत गडबड होता कामा नये, याकडेही लक्ष देण्यात आले आहे. कॉन्स्टेबल गौरवचा १५ दिवसांच्या रजेचा अर्ज मंजूर झाला आहे.