ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - ' मी पंतप्रधान बनेन असं मला कधीही वाटल नव्हतं, पण भारतमातेची सेवा करण्याचं माझं स्वप्नं होतं जे पूर्ण झालं आहे असं सांगत जीवनात फक्त काहीतरी बनण्याचे नव्हे तर काहीतरी चांगलं काम करून दाखवण्याचे स्वप्न पहा' असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांना दिला. चांगलं काम केल्याने समाधान व प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बराक ओबामांनीही देशवासियांच्या विविध विषयांवरील प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
स्वाहिली भाषेत बराक या शब्दाचा अर्थ 'आशीर्वादप्राप्त व्यक्ती' असा होतो, असे सांगत बराक ओबामा यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. लहान असताना मी बेंजामिन फ्रँकलिन यांचे जीवन चरित्र वाचले होते, ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते आणि आजही ते मला प्रेरणा देते असे सांगत सर्वांनी ते चरित्र वाचावे असे आवाहनही मोदींनी केले. 'युवकांनो, जगाला एक करा' असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
'नमस्ते' असे म्हणत बराक ओबामांनी 'मन की बात'ची सुरूवात केली. लोकशाही हा भारत व अमेरिकेच्या मैत्रीतील समान दुवा असून त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. असल्याचे ओबामांनी सांगितले. माझ्या दोन्ही मुली भारतभेटीवर येऊ शकल्या नाहीत पण त्यांच्यावर भारतीय इतिहास, स्वातंत्र्य लढा व संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याचेही ओबामा म्हणाले. संस्कृतीची मूल्ये लोकांना जोडून ठेवतात असेही त्यांनी सांगितले. लठ्ठपणा ही जागतिक समस्या असून फास्ट फूड व व्यायामाचा अभाव हे त्याचं मुख्य कारण आहे. या समस्येवर भारताच्या सहाय्याने काम करू असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात भारत व अमेरिका संयुक्तपणे महत्वाची भूमिका बजावतील असे सांगत पोलिओ व इबोला या आजारांशी लढा देण्यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे ओबामा म्हणाले. भारत व अमेरिकेचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी खूप कष्ट करत असल्याचे सांगत त्याबद्दल ओबामांनी मोदींचे कौतुकही केले. तसेच लोकांना मदत करणं, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणं हे माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट असल्याचे ओबामा म्हणाले.
दरम्यान मोदी व ओबामा यांच्या 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान जे विचार व प्रश्नोत्तरे झाली, त्यांचे 'ई-बूक' प्रसिद्ध होणार आहे. #yeswecan ue हॅशटॅग वापरून विकासासाठी काय करायला हवे, यासंदर्भात सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रसिद्ध झालेल्या निवडक चांगल्या विचारांता या ई-बूकमध्ये समावेश करण्यात येणार आहे.