ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उद्या (४ फेब्रुवारी) पंजाब आणि गोव्यात मतदान पार पडणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध क्लुप्त्या लढवल्या जात असतातच, मात्र आता त्यात फेसबूकनेही सहभाग घेतला आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाटी फेसबूकने दोन नवी टूल्स/ फीचर्स आणली आहेत. पहिले टूल आहे ' रिमाईंडर'चे.. त्यानुसार, ज्या राज्यात मतदान असेल त्या दिवशी संबंधित राज्यातील १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या फेसबूक युजर्सना ' मतदाना'ची आठवण करून देण्यासाठी ' रिमाईंडर' लावण्यात येईल. फेसबूकचे हे रिमाईंडर्स निवडणूक आयोगाच्या वेबसाईटसी जोडण्यात आले असल्याने मतदार आपले मतदान केंद्र आणि मतदानासंबंधी इतर माहिती चेक करू शकतात. तसेच मतदान केल्यानंतर संबंधित मतदार ' Share You Voted' या बटणावर क्लिक करून आपल्या मित्रांना मतदान केल्याचे सांगू शकतात. पण कोणाला मतदान केले, हे मात्र त्यांना शेअर करता येणार नाही.
तर दूसरे टूल/फीचर आहे ते निवडणुकीला उभे राहिलेले वा निवडून आलेल्या उमेदवारांसाठी. त्यानुसार, ते त्यांच्या पदासंबंधी वा कामासंबंधी २०० अक्षरांत माहिती लिहू शकतात.