राजकाेट : ‘टीआरपी गेमिंग झाेन’मध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणीगुजरात उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला कठाेर शब्दांमध्ये फटकारले. एवढ्या वर्षांपासून विना एनओसी हा प्रकार सुरू हाेता. अधिकारी झाेपले हाेते का? आमचा स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर विश्वास नाही. तुम्ही आंधळे झाले हाेते, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत प्रकरण दाखल करून घेतले हाेते. त्यावर साेमवारी सुनावणी झाली.
दरम्यान, सरकारने राजकाेटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव, अतिरिक्त पोलिस आयुक्त विधी चौधरी, पोलिस उपायुक्त (झोन-२) सुधीरकुमार देसाई यांच्यासह महापालिकेचे आयुक्त व आनंद पटेल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. टीआरपी गेम झोनच्या व्यवस्थापनाने नाहरकत प्रमाणपत्रासाठी कधीही अर्ज केला नव्हता अशी माहिती राजकोट अग्निशमन दलाचे प्रमुख आय. व्ही. खेर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
न्यायालयाचे संतप्त सवाल
महापालिकेने सुनावणीदरम्यान सांगितले की, दाेन गेमिंग झाेन दाेन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून आवश्यक मंजुरीविना सुरू हाेते. त्यावर न्यायालयाने संतप्त हाेत प्रश्नांची सरबत्ती केली. मुलांसह २७ जणांच्या मृत्यूनंतर तुम्हाला हे आता कळते. तुम्हाला एवढे माेठे बांधकाम दिसले नाही का? त्यांनी काेणत्या अग्निशमन सुरक्षेसाठी अर्ज केला? तिकीटे विकली जात हाेती. तुम्हाला मनाेरंजन कराबाबत जाणीव हाेती का? महापालिका आयुक्त गेमिंग झाेनच्या उद्घाटनाला गेले हाेते, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. तुम्ही याकडे पूर्णपणे डाेळेझाक केली का? महापालिकेने काय केले? फक्त बसून राहिले का? आमचा आता मनपा प्रशासन आणि गुजरात सरकारवर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयाने विद्यमान आणि जुलै २०२१ पासूनच्या महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे.
कशामुळे लागली आग?
‘गेमिंग झाेन’मधील एक सीसीटीव्ही फुटेज समाेर आले आहे. त्यात दिसते की, पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू हाेते. त्याच्या खाली फाेम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि माेठ्या प्रमाणात थर्माकाेलच्या शीट व इतर साहित्य ठेवले हाेते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे आग लागली. कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अवघ्या दाेन-तीन मिनिटांमध्येच आग राैद्ररूप धारण करते.
हे अधिकारी निलंबित
सरकारने महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक अभियंता जयदीप चाैधरी, सहायक नगररचनाकार गाैतम जाेशी, रस्ते व भवन विभागाचे उपकार्यकारी अधिकारी एम. आर. सुमा, पारस काेठिया यांच्यासह पाेलिस निरीक्षक व्ही. आर. पटेल आणि एन. आय. राठाेड यांना निलंबित केले आहे. त्यांना गंभीर हलगर्जीपणासाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे.