नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करतानाचा व्हीडिओ ट्विट केला. दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हीडिओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मोदींनी उल्लेख केलेला पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेला वॉकिंग ट्रेक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वास्तूत अशाप्रकारचा ट्रॅक अस्तित्त्वात असल्याचे समोर आले आहे. या ट्रॅकबद्दल माहिती देताना मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते, असे मोदींनी म्हटले आहे. एका झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे.
असे सुरु झाले फिटनेस चॅलेंज22 मे रोजी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्व पटवून देण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘फिटनेस चॅलेंज’ हे ट्रेंडमध्ये आहे.