नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच आपल्या सर्वसाधारण वागण्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केरळमधील मच्छिमारांसमेवत एक उनाड दिवस व्यतीत केला. मच्छिमारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांनी चक्क समुद्रात त्यांच्यासोबत उडी मारली. मासेमारीसह समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर, राहुल गांधींचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, त्यातीलच एक फोटो बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शेअर केला आहे.
केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले. किनाऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे किमान १० मिनिटं मच्छिमारांसोबत समुद्रात पोहत होते. राहुल गांधींच्या समुद्रातील डुबकीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी असा हा आमचा सर्वसाधारण नेता म्हणून राहुल गांधींचे फोटो शेअर केले. यापूर्वीही राहुल गांधींचा बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.