जयपूर – सीमा हैदर प्रकरण अद्याप शांत झाले नाही तोवर अंजू मीणा हा विषय चर्चेत आला आहे. अंजू तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा इथं पोहचली. हा प्रवास तिने वाघा बॉर्डर क्रॉस करून केला. अंजूने सीमेपलीकडे जाण्याची घटना भारत-पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेत आहे. आता त्यात अंजूचे पिता प्रसाद थॉमस यांचे विधान समोर आले आहे.
प्रसाद थॉमस म्हणाले की, मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले नाही. अंजूनेही कधी वडिलांना कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही त्यामुळे वडीलदेखील तिच्यापासून दूर राहिले. अंजूच्या सनकी स्वभावामुळे तिला सोडून दिले होते. ती बहुतांशवेळा उत्तर प्रदेशातील कैलोर इथं वास्तव्याला होती. अंजूचे वडील ग्वालियरच्या टेकनपूर इथं राहायला होते. मुलीचे उचललेले पाऊल योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मुलगी सनकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खूप वर्षापूर्वी प्रसाद थॉमस यांनी धर्म परिवर्तन केले होते. त्यांनी इसाई धर्माचा स्वीकार केला होता. ज्यानंतर त्यांचे नाव बदलून प्रसाद थॉमस असं करण्यात आले.
अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंजू पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे. २१ जुलैला ती पाकिस्तानात पोहचली. मी इथं फिरायला आलेली आहे असं अंजूने म्हटलं. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मी पाकिस्तानात आले. इथं येण्याआधी मी सर्व प्लॅनिंग आणि तयारी करूनच आली आहे.
वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानाच पोहचली
भिवाडीहून पाकिस्तानात कशी पोहचली असा प्रश्न अंजूला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. सुरुवातीला भिवाडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसर, तिथून वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानात कुठे थांबली असं तिला विचारले तेव्हा मी इथं एका मित्राच्या घरी थांबली आहे. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे.
२०२० मध्ये नसरुल्लाहशी ओळख
अंजूचा दावा आहे की, २ वर्षापूर्वी तिची ओळख नसरुल्लाहसोबत झाली. माझी तुलना सीमा हैदरशी करणे चुकीचे आहे. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि पाकिस्तानात सध्या मी सुरक्षित आहे. २०२० मध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सेंज केले. व्हॉट्सअपवर बोलणे होऊ लागले. त्याबाबत आई आणि बहिणीला मी पहिल्याच दिवशी सगळे सांगितले होते असं अंजूने म्हटलं.