झारखंडच्या नवादामध्ये एक आश्चर्यकारक तेवढीच भयावह घटना घडली आहे. एका मजुराला खोदकाम करत असताना सापाने दोनवेळा डसले. म्हणून चिडलेल्या मजुराने सापाला पकडून तीन वेळा चावले. आता विषारी कोण? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल साप. पण मजुराने चावा घेतल्याने तो साप मेला आणि मजूर वाचला आहे.
संतोष लोहारसोबत हा प्रकार घडला आहे. तो सध्या हॉस्पिटलमध्ये असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. नवादाच्या रेल्वे प्रकल्पामध्ये संतोष मजुरी करतो. जंगलाच्या भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. यावेळी खोदकाम करत असताना संतोषला सापाने दंश केला. तरीही संतोष खोदतच राहिल्याने सापाने त्याला दुसऱ्यांदा डसले. यामुळे रागावलेल्या संतोषने सापाला तीन ठिकाणी चावा घेतला.
संतोषचा चावा हा साप काही सहन करू शकला नाही. सापाला पकडण्यासाठी त्याने लोखंडी सळीचा वापर केला. संतोषने चावा घेतल्यानंतर साप जागेवरच खल्लास झाला. सापाला चावल्यावरून संतोषला विचारले असता त्याने त्याच्या गावात साप चावल्यावर हाच टोटका अवलंबतात. याबाबत मी फक्त गावातील लोकांकडून ऐकले होते. आता त्याचा वापर केला. जर सापाने तुम्हाला एकदा दंश केला तर तुम्ही त्याला दोनदा चावा घ्या. दोनदा केला तर त्याला तीनदा चावा. असे केल्याने सापाच्या विषाचा परिणाम होत नाही, असे त्याने सांगितले.