ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १० - केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईमुळे 'हवालाबाजां'च्या पायाखालची वाळू सरकली असून ते विकासात अडथळे आणत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले असल्याची टीका सोनिया गांधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे बसलेल्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नाही. सरकार विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस देशाच्या विकासात अडथळा आणत आहे. काँग्रेसच्या आडमुठी धोरणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प झालं आणि संपूर्ण पावसाळी अधिवेशन वाया गेले. देशासाठी महत्वाचे असलेले जीएसटी ( वस्तू व सेवा कर) विधेयक मंजूर होऊ शकले नाही, असा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्षांना संसदेचे कामकाज चालावे असे वाटत होते, काँग्रेसमुळेच विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिकण्याची तयारी नसल्यामुळे एकेकाळी ४०० जागा जिंकणा-या काँग्रेसकडे आता फक्त ४० जागा उरल्या आहेत असे टीकास्त्र त्यांनी सोडले. तसेच आमचे सरकार नुसती आश्वासने देत नाही तर ती आश्वासने प्रत्यक्षात आणण्याच्या योजना आमच्याकडे तयार असतात असेही ते म्हणाले.
दरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या ( २ऑक्टोबर) निमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील गावागावांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.