नवी दिल्ली- शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्यापासून रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. आंदोलनाआधी ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. अण्णा हजारे रामलीला मैदानावर धरणं आंदोलन करणार असून, अण्णांच्या या आंदोलनाला काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे.
काल राळेगणसिद्धीतल्या ग्रामस्थांना निरोप देत अण्णांनी दिल्ली गाठली आहे. काल सकाळी हजारे यांनी ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती मंदिरात दर्शन घेतले होते. त्यानंतर कारने ते पुण्याकडे रवाना झाले होते. पुण्यावरून ते विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. अण्णांना निरोप देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ‘तब्येतीची काळजी घ्या, जास्त दिवस उपोषण करू नका’ अशी विनंती ग्रामस्थांनी अण्णांना केली होती.अण्णा हजारे यांनी सर्वांचा स्मितहास्य करीत निरोप घेतला होता. मी 80 वर्षांचा तरुण आहे, तरुणांमध्ये जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह माझ्यामध्ये आहे, असे अण्णा यांनी दोन दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.