प्रेम खरं असेल, तर प्रियकर-प्रेयसीला कोणतीही सीमा रोखू शकत नाही, ना धर्म ना जात… हेच विधान खरं करून पोलंडमध्ये सातासमुद्रापार राहणाऱ्या बरबरा पोलाक या महिलेने आपला प्रियकर सादाब मलिकसोबत लग्न केलं आहे. यासाठी तिने झारखंडमधील हजारीबाग गाठलं. 45 वर्षीय बरबरा पोलक तिची सहा वर्षांची मुलगी अनन्यासोबत भारतात आली आहे.
2021 मध्ये पोलंडमधील रहिवासी असलेल्या बरबरा पोलकने झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसांडी पोलीस स्टेशन परिसरात राहणारा शादाब मलिक याच्याशी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि बरबरा पोलकने आपले हृदय हजारीबागमध्ये राहणाऱ्या शादाबला दिलं. भारतात येऊन प्रियकराला भेटण्यासाठी बरबराने व्हिसासाठी अर्ज केला.
प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर पोलंडच्या बरबरा पोलाकला पाच वर्षांसाठी भारतात येण्याचा व्हिसा मिळाला. व्हिसा मिळताच तिने थेट दिल्लीमार्गे पोलंडहून झारखंडमधील हजारीबाग गाठलं. सुमारे पाच दिवस हजारीबागमधील एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर ती प्रियकराला भेटण्यासाठी हजारीबागच्या कटकमसंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटरा गावात पोहोचली.
या परदेशी महिलेला पाहण्यासाठी खुटरा गावात लोक जमले होते, जणू शादाब मलिकच्या घरी एखादी जत्रा भरल्यासारखं चित्र होतं. या प्रेमकथेतील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे बरबरा पोलकचे वय सुमारे 45 वर्षे आहे, तर तिचा प्रियकर शादाब मलिकचे वय 35 वर्षे आहे.
शादाबने हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा केला आहे आणि तो त्याच्या करिअरच्या शोधात होता. याच दरम्यान त्याची पोलंडची रहिवासी बरबरा पोलक हिच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. आता शादाब मलिकही आपली सर्वोत्तम कारकीर्द आणि प्रेम मिळाल्यानंतर पोलंडला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करण्याची तयारी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.